बँकांचे व्यवहार ठप्प! देशभरातील १० लाख कर्मचारी संपावर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/dena-bank.jpg)
सलग जोडून आलेल्या सुट्टया आणि बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप यामुळे बँकिंग सेवा विस्कळीत झाली आहे. आजही सार्वजनिक बँकांचे व्यवहार ठप्प राहणार आहेत. आज युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने संप पुकारला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील २१ बँकांचे १० लाख कर्मचारी आणि अधिकारी या संपात सहभागी होतील असा दावा युनियनने केला आहे.
मागच्या पाच दिवसांपासून बँका बंद होत्या. २१ डिसेंबर शुक्रवारी संप होता तर अन्य तीन दिवस सुट्टी होती. विजया बँक आणि देना बँक यांच्या बँक ऑफ बडोदामधील प्रस्तावित विलीनीकरणाला विरोध करण्यासाठी संप पुकारला आहे.
विलीनीकरणाविरोधाबरोबरच आपल्या वेतनविषयक मागण्यांसाठी सरकारी बँकांच्या अधिकारी संघटनांनी शुक्रवारी एक दिवसाचा संप केला होता. सरकारने विजया बँक व देना बँक या दोन सरकारी बँकांच्या बँक ऑफ बडोदात विलीनीकरणाची घोषणा केली होती. हे विलीनीकरण या बँकांच्या किंवा बँक ग्राहकांच्या हिताचे नाही; किंबहुना हे घातक आहे, असे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने म्हटले आहे. यूएफबीयू ही ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स यांच्यासह ९ संघटनांची शीर्षस्थ संघटना आहे.