फजलुल्लाह ठार होणे ही महत्वाची घटना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/terrorist-faju..-6.jpg)
- पाकिस्तानच्या काळजीवाहू पंतप्रधानांची प्रतिक्रीया
काबुल – पकिस्तान तालिबानचा प्रमुख मौलाना फजलुल्लाह अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार होणे ही महत्वाची घटना असून दहशतवादाच्या विरोधातील लढाईतील हे एक महत्वाचे पाऊल आहे असे पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान नासीर उल मुल्क यांनी म्हटले आहे. काल त्यांनी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रीया दिली असे सांगण्यात येते. अफगाणिस्तानच्या अध्यक्षांनी त्यांना मौलाना फजलुल्लाह याच्या संबंधात माहिती दिली.
फजलुल्लाह याच्या मृत्याच्या वृत्ताला अफगाणचे अध्यक्ष घनी यांनी आपल्या ट्विटर अकौंटवरून दुजोराही दिला आहे. त्यानंतर घनी यांनी पाकच्या पंतप्रधानांना फोन करून याविषयीची माहिती दिली. अमेरिकेने मात्र आपण अजून या घटनेची खातरजमा करीत आहोत असे म्हटले आहे. आम्ही केलेल्या ड्रोन हल्ल्यात फजलुल्लाह ठार झाल्याची शक्यता आम्हालाही वाटत आहे पण आम्ही अजून त्याची खातरजमा करून घेत आहोत असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. गेल्या गुरूवारी अफगाणिस्तानातील एका संशयित ठिकाणावर झालेल्या हल्ल्यात फजलुल्लाह आणि त्याचे अन्य पाच साथीदार ठार झाले आहेत.