breaking-newsराष्ट्रिय

प्रियकराला पायलट बनवण्यासाठी तिने घरातूनच चोरले 1 कोटी रुपये

‘लव्ह के लिये कुछ भी करेगा’ हे एका चित्रपटातील गाणं…या गाण्यानुसार गुजरातच्या राजकोटमध्ये एका तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीसाठी घरातच डल्ला मारला. 20 वर्षाच्या या तरुणीने घरातून दागिने आणि रोकड मिळून एक कोटींहून जास्त रुपयांची चोरी केली. बेंगळुरूमध्ये वैमानिकाचं प्रशिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या प्रियकराच्या मदतीसाठी तरुणीने हे पाऊल उचललं. शनिवारी पोलिसांनी दोघांना अटक केली आणि दोघांकडून दागिने आणि रोकड हस्तगत केली.

17 दिवसांनंतर पोलिसांनी लावला छडा –

प्रियंका परसाना नावाच्या तरुणीचे गेल्या दोन वर्षांपासून हेत शाह(20) नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. प्रियंकाच्या वडिलांकडून चोरीची तक्रार आल्याच्या 17 दिवसांनंतर पोलिसांनी याचा छडा लावला. तिच्या वडिलांनी राजकोटच्या भक्तिनगर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. सत्य समोर आल्यानंतर प्रियंकाचे कुटुंबिय एफआयआर मागे घेण्याच्या प्रयत्नात असल्याचं समजतंय. आपला प्रियकर हेत शाह याला वैमानिक बनण्यासाठी ती मदत करत होती आणि त्यासाठीच घरी चोरी करण्याचा निर्णय तिने घेतला आणि 29 नोव्हेंबर रोजी घरीच डल्ला मारला. घरी चोरी झाल्याचा बनाव दाखवण्यासाठी तिने घरात तोडफोडही केली.

3 किलो सोन्याचे दागिने आणि 64 हजार रोकड चोरली –
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराच्या कपाटातून 90 लाख रुपयांचे 3 किलो सोन्याचे दागिने, 2 किलो चांदीचे दागिने आणि 64 हजार रुपयांची रोकड चोरली, घरातून आई आणि मोठी बहिण बाहेर गेली असताना तिने डाव साधला. चोरीनंतर संशय येऊ नये यासाठी तिने घरात तोडफोडही केली आणि दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास घराला कुलुप लावून ती घरातून बाहेर पडली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वडिल घरी आल्यावर त्यांना घरात काहीतरी गडबड झाल्याचं कळलं आणि घरात चोर शिरल्याची तक्रार त्यांनी तातडीने पोलिसांत तक्रार केली. मात्र एक डिसेंबर रोजी प्रियंकाची आई घरी परतल्यावर आईने घराचं कपाट उघडलं असता त्यातून दागिने आणि रोकड गायब असल्याचं समजल्यावर इतकी मोठी चोरी झाल्याचं त्यांना समजलं. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली मात्र, जबरदस्ती घरात प्रवेश केल्याचे कोणतेच निशाण त्यांना मिळाले नाहीत आणि कपाट ड्युप्लिकेट चावीने उघडल्याचं लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले तसंच प्रियंकाची चौकशीही केली मात्र त्यांना काही पुरावे मिळाले नाहीत. मात्र संशय प्रियंकावरच असल्यामुळे त्यांनी प्रियंकावर लक्ष ठेवलं आणि तिचं हेत शाह याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचं त्यांना समजलं. पोलिसांनी हेतच्या बाबतीत चौकशी केली असता चोरीच्या दुसऱ्याच दिवशी तो बेंगळुरूला रवाना झाल्याचं त्यांना कळलं. त्यानंतर क्राइम ब्रांच पोलिसांचं एक पथक बेंगळुरूला पोहोचलं आणि हेतची चौकशी केली. पोलिसांच्या चौकशीत प्रियंकाने चोरीचं प्लॅनिंग केल्याचं त्याने कबुल केलं त्याच्याकडून चोरीचं सामान देखील हस्तगत करण्यात आलं. हेतला वैमानिक बनायचं होतं आणि शुल्क भरण्यासाठी त्याला 20 लाख रुपयांची गरज होती. त्याचं वैमानिक बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रियंकाने घरातच चोरी केल्याचं उघडकीस आलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button