पोलिसात तक्रार नोंदवली म्हणून पती-पत्नीची भोसकून हत्या
![Murder of daughter of former ambassador of Pakistan](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/murder-couple.jpg)
विनयभंगाची तक्रार नोंदवल्याचा राग मनात धरुन प्रशांत जैन या युवकाने एका जोडप्याची भोसकून हत्या केली तर त्याच्या मुलाला गंभीर जखमी केले. मध्य प्रदेशच्या कतनी जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर आरोपी युवकाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात जोगेश्वर लोधी (४५) त्यांची पत्नी गीता बाई (४०) यांचा मृत्यू झाला तर मुलगा हरीशंकर गंभीर जखमी झाला आहे.
बाकलीहाता गावात ही घटना घडली. जोगेश्वर यांनी सकाळी ५.३० च्या सुमारास घराचा दरवाजा उघडल्यानंतर समोर प्रशांत जैन हातात चाकू घेऊन उभा होता. तो मध्यरात्रीपासून दार उघडण्याची वाट पाहत घराबाहेर थांबला होता. दरवाजा उघडताच त्याने जोगेश्वर यांच्यावर ते खाली कोसळेपर्यंत वार केले. नवऱ्यावर हल्ला झाल्यानंतर गीता बाई किंचाळत बाहेर आल्या. त्यावेळी हल्लेखोराने त्यांच्यावरही वार केले.
आई-वडिलांच्या मदतीला हरीशंकर धावून आल्यानंतर त्याच्यावरही प्रशांतने वार केले. तिघेही रक्ताच्या थारोळयात पडलेले असताना प्रशांत घराच्या गच्चीवर गेला व तिथे त्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने लोधी यांची १६ वर्षांची मुलगी या हल्ल्यातून बचावली. जोगेश्वर आणि त्यांच्या पत्नीला स्थानिक रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले.प्रशांत आणि हरीशंकर अतिदक्षता विभागात असून त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याची माहिती आहे. मुलीला त्रास देत असल्या प्रकरणी लोधी कुटुंबाने आरोपी प्रशांत विरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या विरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती. तीन दिवसांपूर्वीच प्रशांतची जामिनावर सुटका झाली होती. या दुहेरी हत्येमध्ये परिसरात अनेकांना धक्का बसला आहे.