पेट्रोलियम उत्पादने टप्प्याटप्याने जीएसटीत आणणार
अर्थ सचिव हसमुख अधिया यांची माहिती
नवी दिल्ली – पेट्रोलियम उत्पादने जीएसटीत आणली जातील पण ही प्रक्रिया टप्प्याटप्याने पुर्ण केली जाईल अशी माहिती केंद्रीय अर्थ सचिव हसमुख अधिया यांनी आज येथे दिली. पेट्रोल आणि डिझेल तसेच एलपीजी गॅस ही उत्पादने जीएसटीत आणावीत अशी मागणी वारंवार केली जात आहे. जीएसटी कौन्सिलने त्याला मान्यता दिली तरच हे शक्य आहे. असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष एस. रमेश यांनी म्हटले होते त्यावर प्रतिक्रीया देताना हसमुख अधिया यांनी ही माहिती दिली.
सध्या पेट्रोल डिझेल सह विमानाला लागणारे इंधन आणि नैसर्गिक वायु जीएसटीच्या बाहेर आहे. त्यामुळे प्रत्येक राज्याकडून त्यावर मनमानी पद्धतीने कर लागू केले जात आहेत. ही उत्पादने जीएसटीत आणल्यास त्यावर कमाल 28 टक्के दराने जरी कर लागू केला तरी या इंधनाच्या किंमती बऱ्याच खाली येतील आणि त्यांचे दरही समान राहतील असे सांगण्यात येत आहे. तथापी तसे करण्यास काहीं राज्यांचा प्रखर विरोध आहे.
आज येथे पत्रकारांशी बोलताना अधिया म्हणाले की ही उत्पादने जीएसटीत आणली जातील परंतु ती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पाडावी लागणार आहे. विमानासाठी लागणाऱ्या इंधनावर राज्यांकडून मोठ्या प्रमाणात कर लावण्यात आल्याने त्याच्या विरोधात विमान वाहतूक मंत्रालयानेही आवाज उठवला आहे.
या इंधनाचे दर वाढीव असल्याने विमान प्रवासाचे दरही महागडेच ठेवावे लागत आहेत. त्यामुळे या मंत्रालयानेही विमानासाठीचे इंधन जीएसटीत आणण्याची लेखी सूचना अर्थमंत्रालयाला केली आहे. त्यामुळे नैसर्गिक वायू आणि विमानाला लागणारे इंधन लवकरच जीएसटीत आणले जाईल अशी माहिती अर्थमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. आम्ही त्यादृष्टीने प्रक्रिया सुरू केली आहे असे ते म्हणाले.
जीएसटीची सारी प्रक्रिया स्वयंचलीत पद्धतीने करण्याचाही प्रयत्न केला जात आहे असे अधिया यांनी सांगितले. त्यामुळे करदात्यांची कटकट कमी होऊ शकते.