पॅराग्वेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ‘एलिसिया पुचेता’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/president-.jpg)
ऍसुन्शियन (पॅराग्वे) – पॅराग्वेच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला देशाची राष्ट्रपती बनण्याचा सन्मान मिळालेला आहे. पॅराग्वेच्या उप राष्ट्रपती एलिसिया पुचेता (68) या देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्या आहेत. राष्ट्रपती होरॅशियो कार्टस यांनी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागी उप राष्ट्रपती एलिसिया पुचेता यांची राष्ट्रपतीपदी निवड करण्यात आलेली आहे. अर्थात त्यांच्या राष्ट्रपतीपदाची मुदत 15 ऑगस्ट 2018 पर्यंतच असणार आहे. 15 ऑगस्ट रोजी नवनिर्वाचित राष्ट्रपती मारियो अब्दो बेनिटेज हे राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारतील.
पॅराग्वेच्या निवडणुका 22 एप्रिल रोजी झाल्या आणि त्यात मारियो अब्दो बेनिटेज यांची राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे. होरॅशियो कार्टस यांनी आपला कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा दिल्याने एलिसिया पुचेता यांना देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनण्याची संधी मिळाली आहे. गर्भपाताला मान्यता देणाऱ्या कायद्याला विरोध करणाऱ्या एलिसिया पुचेता या दक्षिणपंथी कोलोराडो पक्षाच्या सदस्या आहेत. गेली अनेक दशके कोलोराडो पक्षाची पॅराग्वेवर सत्ता राखून आहे.