पाकिस्तानात हिंदू व्यापाऱ्याची मुलासह गोळ्या घालून हत्या
इस्लामाबाद- पाकिस्तानातील बलूचिस्तान प्रांतातील एका हिंदू व्यापारी आणि त्याच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही दुर्घटना लासबेला जिल्ह्यातील हुब शहरात शनिवारी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी जयपाल दास हे आपला मुलगा हरेश याच्या सोबत शनिवारी रात्री एका सिमेंट कंपनीजवळून जात होते. याप्रसंगी अचानक अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. याला दास यांनी विरोध केल्यानंतर हल्लेखोरांनी दोघांची गोळ्या घालून हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो कुटुंबियांच्या हवाली करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दरम्यान, लासबेलाचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक मोहम्मद हाशिम यांनी बलूचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार धनीश कुमार यांच्यासह हिंदू समुदायाची भेट घेत या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. हाशिम म्हणाले, या घटनेचा तपास करण्यासाठी एक खास पथक नेमण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपिंना लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.