पाकिस्तानने दहशतवादाकडे लक्ष द्यावे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/pak-flag.jpg)
संयुक्त राष्ट्रे – काश्मीरवर वक्रदृष्टी ठेवणाऱ्या पाकिस्तानने पुन्हा त्या मुद्द्याचे तुणतुणे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत वाजवले. त्यावरून भारताने सज्जड शब्दांत पाकिस्तानला सुनावले. वादविवादात न अडकता पाकिस्तानच्या नव्या सरकारने दक्षिण आशियाई विभागाला दहशतवादमुक्त आणि हिंसाचारमुक्त बनवण्यासाठी कार्य करावे, अशा कानपिचक्या भारताने दिल्या.
कुठल्याही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर बाजू मांडण्याची संधी मिळाल्यावर पाकिस्तानला काश्मीर मुद्दा उपस्थित करण्याची लहर येते. बुधवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत झालेल्या चर्चेवेळी पाकिस्तानच्या प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी पुन्हा ती कृती केली. त्याला भारताचे स्थायी प्रतिनिधी सैद अकबरूद्दीन यांनी सडेतोड उत्तर दिले. भारताचा अविभाज्य भाग असलेल्या काश्मीरचा पाकिस्तान अनावश्यक उल्लेख करत आहे. त्या देशाच्या तोंडी पुन्हा-पुन्हा अपयशी भूमिका येत आहे, असे अकबरूद्दीन यांनी म्हटले.
काश्मीर मुद्दा पुढे करून पाकिस्तान सातत्याने भारतविरोधी थयथयाट करतो. मात्र, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानची बाजू ऐकून घेण्यास कुणीच उत्सुक नसतानाही त्या देशाला शहाणपण येत नाही. सत्ताबदलानंतरही पाकिस्तानने जुनेच तुणतुणे वाजवले. त्यामुळे अकबरूद्दीन यांनी त्या देशातील नव्या सरकारला योग्य जाणीव करून दिली.