पाकिस्तानची सर्वोच्च पदे बिगरमुस्लीमांना खुली करण्याचे विधेयक रोखले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/pakistan.jpg)
इस्लामाबाद : बिगरमुस्लीम व्यक्तीला पाकिस्तानचे अध्यक्ष आणि पंतप्रधानपद भूषविण्यास मान्यता देण्यासाठी घटनेत दुरुस्ती करण्याची मागणी करणारे मांडण्यात आलेले विधेयक पाकिस्तानच्या संसदेने रोखले आहे.
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे ख्रिश्चन लोकप्रतिनिधी डॉ. नावीद आमिर जीवा यांनी बुधवारी घटनेतील कलम ४१ आणि ९१ मध्ये दुरुस्ती सुचविणारे विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला. तथापि, संसदीय व्यवहारमंत्री अली मोहम्मद यांनी त्याला विरोध केला. पाकिस्तान हे इस्लामिक प्रजासत्ताक असल्याने केवळ मुस्लीम व्यक्तीच देशाची अध्यक्ष आणि पंतप्रधान होऊ शकते, असे ते म्हणाले.
दरम्यान, अल्पसंख्याकांना संरक्षण देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करावी असे सूचित करणारा आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने २०१४ मध्ये दिला होता, त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात एका महिन्यात अहवाल सादर करावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी पाकिस्तानातील मध्यवर्ती आणि प्रांतिक सरकारांना दिला.