पाकिस्तानची बाजू घेणारे आता ईव्हीएमला दोष देतात; मोदींचा विरोधकांना चिमटा
![Every citizen of the country will get the benefit of development without any discrimination - Prime Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/modi-11-1.jpg)
पाकिस्तानची बाजू घेणारी लोक आता मोदी आणि ईव्हीएमला दोष देत आहेत. या लोकांना जनतेच्या भावना समजत नाहीत. आता मतदारांनी तीन टप्प्यात झालेल्या मतदानातून त्यांना (विरोधकांना) योग्य तो संदेश दिला आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. महामिलावट करणारी लोक सांगतात की दहशतवाद हा महत्त्वाचा मुद्दा नाही. दहशतवादाने श्रीलंकेत ३५० लोकांचे प्राण घेतले, मग हा महत्त्वाचा मुद्दा ठरत नाही का? आपल्या शेजारी दहशतवाद्यांची फॅक्टरी सुरु आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बिहारमधील दरभंगा येथे प्रचारसभा घेतली. या सभेत मोदींनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. तुमचे एक मत मोदींना दिले तर मोदी दहशतवाद संपवल्यावरच शांत बसणार, आपला देश हा मजबूत असायला पाहिजे आणि त्यासाठी देशात एक मजबूत सरकार हवं. तुमचे एक मत दहशतवाद संपवू शकते आणि यासाठी तुम्ही चौकीदाराला पाठिंबा दिला पाहिजे, असे आवाहन मोदींनी केले.
भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणाच आमच्या आयुष्यातील शक्ती आहे. आपल्या आजूबाजूला दहशतवाद्यांची फॅक्टरी आहे आणि ही लोक (विरोधक) म्हणतात की दहशतवाद हा महत्त्वाचा मुद्दा नाही. दहशतवादाने श्रीलंकेत ३५० हून अधिक लोकांचे प्राण घेतले, मग हा प्रमुख मुद्दा वाटत नाही का, असा सवालही त्यांनी काँग्रेसला विचारला. ‘महामिलावट’ करणाऱ्यांसाठी दहशतवाद हा प्रमुख मुद्दा नसेल, पण भारतात दहशतवाद ही एक मोठी समस्या आहे. गरीबांचे सर्वाधिक नुकसान दहशतवादामुळेच झाले, असा दावा मोदींनी केला.