पाकिस्तानकडून भारतासोबतची टपाल सेवा पुर्ववत; पार्सल सेवा मात्र बंदच!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/India-pakistan-.jpg)
भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने टोकाचे पाऊल उचलत भारतासोबतची टपाल सेवा अचानक बंद केली होती. यावर आंतरराष्ट्रीय निकषांचे उल्लंघन झाल्याचा आरोप भारताने केला होता. भारताच्या दबावानंतर पाकिस्तानकडून पुन्हा ही टपाल सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. मात्र, पार्सल सेवा अद्यापही बंदच आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या हवाल्याने एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.
पाकिस्तानकडून भारतासोबतची टपाल सेवा बंद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ऑक्टोबर महिन्यांत दिली होती. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ही गोष्ट घडली होती. त्यामुळे भारताने पाकिस्तानच्या या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला होता. पाकिस्तानच्या या एकतर्फी कारवाईचा निषेध करताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले होते, पाकिस्तानने हे पाऊल उचलत आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केले आहे. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय पाकिस्तानने गेल्या दोन महिन्यांपासून भारताची टपाल सेवा बंद केली आहे. ऑगस्ट महिन्यापासूनच भारताकडून आलेल्या टपालांचा स्विकार पाकिस्तानने केलेला नाही.