पाककडून कृष्णा घाटीत पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताचे चोख प्रत्युत्तर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/Ceasefire-violation.jpg)
एकीकडे भारताला चर्चेचे आवाहन करणाऱ्या पाकिस्तानने दुटप्पी धोरण अवलंबले आहे. गुरुवारी सकाळी पाकिस्तानने सीमारेषेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत बेसुमार उखळी तोफांचा मारा आणि गोळीबार केला. भारतीय लष्करानेही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. हा प्रकार जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटीत सकाळी ६ ते ७ असा सुमारे एक तास सुरू होता. दरम्यान, सीमेजवळील सर्व गावातील शाळांना सुटी देण्यात आली आहे. सीमारेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
भारतीय वायूसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळावर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यामुळे सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
संरक्षण दलाचे प्रवक्ते ले.कर्नल देवेंदर आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाकोट आणि मानकोट परिसराजवळ सीमेपलीकडून उखळी तोफांचा मारा करण्यात आला. सकाळी ७ वाजता हा प्रकार थांबला. यामध्ये कोणतीही जीवित व वित्तहानी झालेली नाही. भारतीय सैन्यदलाने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.