पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Untitled-6.jpg)
- भाजपच्या केंद्रीय प्रतिनिधी मंडळाची भाटपाडय़ाला भेट
पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्य़ाच्या भाटपाडा येथे लागू असलेल्या भादंविच्या कलम १४४चे उल्लंघन करून शनिवारी प्रतिस्पर्धी गटांमध्ये पुन्हा घडलेल्या चकमकींमध्ये अनेक लोक जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
भाजपचे तीन सदस्यांचे केंद्रीय प्रतिनिधीमंडळ भाटपाडय़ाचा नियोजित दौरा आटोपून येथून निघाल्यानंतर काही वेळातच हा हिंसाचार घडला. प्रतिनिधीमंडळ निघून गेल्यानंतर भाजपच्या नेतृत्वाखालील एक आणि तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखालील दुसरे अशा दोन गटांमध्ये धुमश्चक्री झडली. दोन्ही गटांनी एकमेकांवर देशी बॉम्ब आणि दगड फेकले. यात अनेक लोक जखमी झाले.
दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री एस. एस. अहलुवालिया यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या तीन सदस्यांच्या प्रतिनिधी मंडळाने शनिवारी हिंसाचारग्रस्त भाटपाडय़ाला भेट दिली. या ठिकाणी तृणमूल काँग्रेस व भाजपशी संबंधित दोन गटांमध्ये गुरुवारी झालेल्या संघर्षांत दोन जण ठार, तर ७ जण जखमी झाले होते.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने, पश्चिम बंगालमधील खासदार असलेल्या अहलुवालिया यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाला भाटपाडय़ाला भेट देण्यास सांगितले होते. त्यांच्यासोबत सत्यपाल सिंह व बी. डी. राम हे खासदार आणि राज्यातील इतर नेते होते. सिंह व राम हे दोघे माजी पोलीस अधिकारी असून अनुक्रमे उत्तर प्रदेश व झारखंडमधील खासदार आहेत. बराकपूरचे खासदार अर्जुन सिंह हेही या वेळी सोबत होते.
या प्रतिनिधी मंडळाने भाटपाडा दंगलीतील मृतांच्या कुटुंबीयांना भेट दिली, तसेच स्थानिक लोकांशी चर्चा केली. भाजपचे हे प्रतिनिधी मंडळ नंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांना अहवाल सादर करणार आहे, असे सांगण्यात आले.
सीबीआयमार्फत चौकशीची मागणी
यापूर्वी, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अब्दुल मन्नान व माकप नेते सुजन चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखालील माकप आणि काँग्रेस यांच्या संयुक्त प्रतिनिधी मंडळाने बारुईपाडा, जगत्दाल व भाटपाडा या दंगलग्रस्त भागांना भेट दिली. या ठिकाणी झालेल्या हत्यांची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. बळींच्या घटनांमागील सत्य शोधून काढण्यासाठी सीबीआयमार्फत चौकशीची मागणी भाजपच्या नेतृत्वानेही शुक्रवारी केली होती.