पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडोनेशियात उडवला पतंग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/prime-minister-narendra-modi-.jpg)
जकार्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इंडोनेशियाच्या दौ-यावर आहेत. नरेंद्र मोदींनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको व्हिडोडो यांच्याशी जकार्तामधील मर्डेका पॅलेसमध्ये चर्चा केली. तसेच, भारत आणि इंडोनेशियाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मंचांसोबतच्या संयुक्त संवादासाठी ते उपस्थित होते. यावेळी दहशतवादाच्या मुद्यावर त्यांनी निशाना साधला. दोन्ही देशांत 15 करारांवर सह्या करण्यात आल्या.
इंडोनेशियात नरेंद्र मोदी यांनी येथील मशिदीला भेट दिली. याचबरोबर, जकार्तामधील मॉन्यूमेंट सेंटरमध्ये पतंग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. रामायण आणि महाभारत या थीमवर या प्रदर्शनात पतंग तयार करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्धाटन नरेंद्र मोदी आणि जोको व्हिडोडो यांनी केले. यावेळी त्यांनी पतंग उडवला. दरम्यान, या पतंग प्रदर्शनाचे आयोजन जकार्तामधील लयांग-लयांग म्यूझियम आणि अहमदाबादमधील काईट म्यूझियमतर्फे करण्यात आले होते.
नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर दौऱ्यावर रवाना झाले आहेत. उद्या सिंगापूरला जाणार आहेत. सिंगापूर दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी फाइनटेक, कौशल्य विकास, शहरी नियोजन आणि कृत्रिम बुद्धीमत्ता या क्षेत्रात भारत-सिंगापूर भागीदारी अधिक बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत. सिंगापूरमध्ये भारत-सिंगापूर उद्योग आणि नवोन्मेष प्रदर्शनाला भेट देणार आहे. सिंगापूरच्या प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत व्यवसाय आणि गुंतवणूक संधींबाबत चर्चा आणि व्यावसायिक आणि समुदायाला संबोधित करणार आहेत.