नोकरीवरुन काढल्याच्या रागातून एचआर हेडवर गोळी झाडली !
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/2-Murder-Imagae.jpg)
गुरुग्राम : नोकरीवरुन काढल्याच्या रागातून एका कर्मचाऱ्याने एचआर हेडवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना गुरुग्रामच्या एक जपानी कंपनीत घडली आहे. या घटनेत जखमी झालेल्या एचआर हेडला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
योगेंद्र असे आरोपीचे नाव आहे. एचआर हेड बिनेश शर्माने त्याला काही दिवसांपूर्वीच कामावरुन काढले होते. तो एका नातेवाईकासह कंपनीत आला होता. त्यानंतर एचआर हेडवर गोळ्या झाडून तिथून ते पसार झाले. पीडित एचआर हेडवर रॉकलॅण्ड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एचआर हेड बिनेश शर्मा यांच्या मानेला गोळी लागल्याचे पोलिसांचे प्रवक्ते रवींद्र कुमार यांनी सांगितले.
बिनेश शर्मा आपल्या कंपनीच्या दिशेने जात असताना, विलासपूरमध्ये बाईकस्वाराने त्यांच्यावर गोळी झाडली. शर्मा यांच्या कारचा आरसा छेदत गोळी त्यांच्या मानेत घुसली. हल्लेखोराचा चेहरा झाकलेला होता. त्याआधी आरोपीने बिनेश शर्माला थांबण्याची सूचना केली होती, पण त्यांनी कार जोरात पळवली. त्यानंतर आरोपीने कारला ओव्हरटेक करुन बिनेश शर्मा यांच्यावर गोळबार केला.
एका आरोपीने हेल्मेट घातले होते तर दुसऱ्याने चेहरा झाकला होता. काही दिवसांपूर्वीच एचआर हेड बिनेश शर्मा यांनी मुख्य आरोपी योगेंद्रला नोकरीवरुन काढले होते. तेव्हा योगेंद्र आणि त्याच्या कुटुंबीयांनी एचआर हेडला याचे परिणाम भोगण्याची धमकीही दिली होती. दरम्यान, पोलिस आता आरोपींचा तपास करत आहेत.