नेदरलॅण्डच्या महाराणी मॅक्सिमा आणि पंतप्रधानांची भेट
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नेदरलॅण्डच्या महाराणी मॅक्सिमा यांची भेट घेतली. महाराणी मॅक्सिमा, विकासाच्या सर्वसमावेशक वित्तासाठी संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांच्या विशेष दूत म्हणून भारताच्या दौऱ्यावर आल्या आहेत.
भारतामध्ये आर्थिक समावेशनाला बळकटी देण्यासाठी भारत सरकारने मागील काही वर्षात राबवलेल्या जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना तसेच अटल पेंशन योजना यासारख्या विविध उपक्रमांविषयी पंतप्रधान मोदी आणि महाराणी मॅक्सिमा यांनी चर्चा केली. या उपक्रमांमुळे झालेल्या प्रगतीचे महाराणी मॅक्सिमा यांनी कौतुक केले.
उभय नेत्यांनी जागतिक विकास आर्थिक विषयावर देखील चर्चा केली. या दिशेने भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य योजनेच्या माध्यमातून भारताच्या प्रयत्नांचे महाराणी मॅक्सिमा यांनी कौतुक केले. परदेशात यजमान देशाच्या आवश्यकता आणि प्राधान्यानुसार विकास प्रकल्पासाठी कमी दरात कर्ज देण्याच्या तरतुदीचे देखील महाराणी मॅक्सिमा यांनी कौतुक केले.