निवडणुकांच्या तारखा जाहीर होईपर्यंत देशात काहीही घडू शकतं : नितीश कुमार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/nitish-kumar-1.jpg)
ममता बॅनर्जी विरुद्ध सीबीआय या वादामध्ये विविध राजकीय पक्षांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. यामध्ये आता बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे प्रमुख नितीश कुमार यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर होईपर्यंत देशात काहीही घडू शकतं असं त्यांनी म्हटले आहे.
नितीश कुमार म्हणाले, कोलकात्यात जे घडलं त्यावर ते घडवणारेच स्पष्टीकरण देतील, अशा गोष्टींवर मी प्रतिक्रिया देत नाही. सीबीआय आणि सरकार यावर बोलतील. पण, निवडणुकांची तारीख जोपर्यंत जाहीर होत नाही, तोपर्यंत देशात काहीही घडू शकतं, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
सध्या देशभरात ममता बॅनर्जी आणि सीबीआय यांच्यातील नव्या वादावर चर्चा सुरु आहे. सीबीआयच्या कारवाईमागे मोदी-शहांचा हात असल्याचा आरोप ममतांनी केला आहे. भाजपा नेत्यांच्या सभांना परवानगी नाकारल्यानेच त्यांनी सुड उगवण्यासाठी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी छापेमारीचा प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मात्र, सीबीआयचे अधिकारी ही कारवाई करण्यासाठी कोर्टाच्या वॉरंटविना आल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. त्यामुळे केंद्रीय संस्थांवर दबाव आणत त्यांचा गैरफायदा घेत मोदी आणि शहा यांनी संघराज्य पद्धतीवर घाला घालण्याचे काम सुरु केल्याचा गंभीर आरोप करीत याविरोधात त्यांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे. ममतांच्या या भुमिकेला अनेक विरोधीपक्षांनी पाठींबा दर्शवला आहे.