निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाने दोन दोषींच्या याचिकेवरील निर्णय ठेवला राखून
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/supreme-court-1.jpg)
नवी दिल्ली -निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोन दोषींनी त्यांना ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेच्या निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या फेरविचार याचिकेवरील निर्णय आज न्यायालयाने राखून ठेवला.
देशाची राजधानी दिल्लीत 16 डिसेंबर 2012 ला निर्भया प्रकरण घडले. देशभरात संतापाची प्रचंड लाट उसळवणाऱ्या त्या प्रकरणात मुकेश (वय 29), पवन गुप्ता (वय 22), विनय शर्मा (वय 23) आणि अक्षयकुमार सिंह (वय 31) या दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने 5 मे 2017 या दिवशी शिक्कामोर्तब केले. दोषींपैकी विनय आणि पवन यांनी शिक्षेच्या निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी याचिका दाखल केली आहे. दोषींच्या बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला. मुकेशच्या फेरविचार याचिकेवरील निर्णय याआधीच राखून ठेवण्यात आला आहे. तर अक्षयने अजून तशी याचिका दाखल केलेली नाही.