नासाच्या ‘इनसाइट’ यानाचे मंगळ ग्रहावर यशस्वी लँडिंग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/nasa-mars-insight-759.jpg)
नासाचे इनसाइट (इंटरिअर एक्सप्लोरेशन यूजिंग सिस्मिक इन्व्हेस्टिगेशन) यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. सोमवार आणि मंगळवारच्या दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १ वाजून २४ मिनिटांनी इनसाइट यान मंगळ ग्रहावर उतरले. नासाकडून याचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले. मंगळ ग्रहावरील रहस्य जाणून घेण्यासाठी हे यान बनवण्यात आले आहे. ग्रहाच्या पृष्ठभागावर यान उतरताना १९८०० किमी प्रति तास वेगाने जाणारे हे यान सहा मिनिटांत शून्य वेगावर आले. त्यानंतर यान पॅराशूटमधून बाहेर आले आणि लँड झाले. दरम्यान, इनसाइटने मंगळ ग्रहावरुन आपले पहिले छायाचित्रही पाठवले आहे.
सहा महिन्यांच्या प्रवासानंतर इनसाइटने मंगळावर लँड केले. नासाच्या या प्रकल्पासाठी १ बिलियन डॉलर म्हणजेच ७० अब्ज रुपये खर्च करण्यात आले आहे. सौर ऊर्जा आणि बॅटरीने ऊर्जा मिळवणाऱ्या लँडरला २६ महिन्यांपर्यंत संचलित केले जाऊ शकते. परंतु, नासाला यापेक्षा अधिक कालावधी ते सुरु राहू शकेल अशी अपेक्षा आहे.
नासाने म्हटले आहे की, इनसाइट यान पृष्ठभागावर १० ते १६ फुट खोल खड्डा करेल. यापूर्वीच्या मंगळ अभियानांच्या तुलनेत हे १५ टक्के अधिक खोल असेल. २०३० पर्यंत मनुष्याला मंगळावर पाठवण्याच्या प्रयत्नासाठी नासाला मंगळ ग्रहाचे तापमान समजणे महत्वाचे आहे.
इनसाइट यान हे मंगळावरील मानव मिशनपूर्वी त्याच्या पृष्ठभागावर उतरणे आणि येणाऱ्या भूकंपाचे मापन करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. यानातील सिस्मोमीटरच्या मदतीने मंगळावरील अंतर्गत परिस्थितीचा अभ्यास केला जाईल.