‘नारी शक्ती पुरस्कार’ आयएनएसव्ही तारीणी पथकाला प्रदान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/tarini-l.jpg)
नवी दिल्ली : महिला आणि बाल विकास मंत्री मनेका संजय गांधी यांनी आज नवी दिल्ली येथे आयएनएसव्ही तारीणीच्या सर्व सदस्यांना मानाचा नारी शक्ती पुरस्कार प्रदान केला. या पथकाच्या सहाही सदस्य महिला होत्या. यामध्ये लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर स्वाती पतारपल्ली, लेफ्टनंट ऐश्वर्या बोडापत्ती, लेफ्टनंट एस. विजयादेवी, लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश होता.
यावेळी गांधी यांनील आयएनएसव्ही तारीणीच्या सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि म्हणाल्या की, ऐतिहासिकदृष्ट्या महिलांचा सहभाग फारच कमी असलेल्या क्षेत्रात भरीव कार्य करू इच्छिणाऱ्या भावी पिढीसाठी आयएनएस तारीणी पथक एक प्रेरणा आहे. नारी शक्ती पुरस्कार हा या पथकाचे अनुकरणीय धैर्य आणि संघ भावनेला स्विकारण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे आहे असे गांधी म्हणाल्या.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन (8 मार्च 2018) रोजी नारी शक्ती पुरस्कारांचे वितरण केले होते. परंतु त्यावेळी आयएनएसव्ही तारीणीची समुद्र परिक्रम सुरू असल्याने आज त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पथकातील प्रत्येक सदस्याला 20 हजार समुद्री मैलाची समुद्र परिक्रमा करण्याचा अनुभव मिळाला. जागतिक व्यासपीठावर नारी शक्तीला प्रोत्साहित करणे हा देखील या प्रकल्पाचा उद्देश होता. लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी यांच्या नेतृत्वाखाली 6 महिला सदस्यांनी समुद्र परिक्रम पूर्ण केली. 254 दिवसाच्या प्रवासात या पथकाने 199 दिवसात 21, 600 सागरी मैलाचा प्रवास पूर्ण केला. यामध्ये त्यांनी फ्रिमेंटले, ऑस्ट्रेलिया, लायटेलटॉन, न्यूझीलंड, स्टॅनले, फाल्कलॅण्डस, कॅपटाऊन, दक्षिण आफ्रिका आणि शेवटी मॉरिशस असा प्रवास केला. पथकातील सहाही सदस्यांना कॅप्टन दिलीप दोंदे यांनी तीन वर्ष प्रशिक्षण दिले होते.