नागपूर पोलीस आयुक्तालय ३१ ऑगस्टपर्यंत जनतेसाठी बंद
नागपूर – पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर नागपुरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनादेखील कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. निलेश भरणे यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर खबरदारीची उपाययोजना म्हणून आजपासून ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस आयुक्त कार्यालय सामान्य जनतेसाठी बंद ठेवले जाणार आहे.
नागपूर शहरात कोरोनाचा संसर्ग वाढीस लागल्याने जिल्हा परिषदेचे मुख्यालय आठ दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. त्यानंतर आता पोलीस आयुक्त कार्यालयात सुद्धा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. आयुक्तालयात कोरोनाचा शिरकाव झाल्याने बुधवारी हे संपूर्ण कार्यालय सॅनिटाईज करण्यात आले. मात्र ३१ ऑगस्टपर्यंत सामान्य जनतेला कार्यालयात प्रवेश मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, कालच महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे हेही कोरोनाबाधित आढळले होते. त्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त भरणे यांनादेखील कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे नागपुरात आता दोन वरिष्ठ अधिकारी कोरोनाग्रस्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.