नवी दिल्लीत रेशनदुकानदारांचे “जेल भरो’ आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/News-Delhi-andolan-.jpg)
- तेव्हाच अच्छे दिन येतील – प्रल्हाद मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारत भ्रष्टाचार मुक्त करण्याचे स्वप्न असून त्यांनी अच्छे दिनचे जनतेला आश्वासन दिले होते. पण जेव्हा प्रत्येक गरिबाचे पोट भरेल आणि त्याला योग्य मोबदला मिळेल. तेव्हाच अच्छे दिन येतील, असा टोला संघटनेचे उपाध्यक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी लगाविला. सरकारने रेशन दुकानदारांचे कमिशन प्रति किलो अडीच रूपये करावे किंवा दरमहा 50 हजार रूपये मासिक पगार द्यावा, अशी मागणी केली.
नवी दिल्ली- अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत नागरिकांना धान्य मिळणे आवश्यक असताना त्यांना धान्याऐवजी रोख स्वरूपात सबसिडी देण्यात येत आहे. यामुळे आज देशभरात भूकबळी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अन्नधान्याऐवजी रोख स्वरूपात रक्कम देणे म्हणजे अन्न सुरक्षा कायद्यांची पायमल्लीच आहे. याचा विपरित परिणाम रेशन दुकानदारांवरही होत आहे. ओटीपी व ई-पॉस मशीनद्वारे रेशन वितरित करण्यात येत असतानाही रेशनदुकादारांवर नाहक कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई तातडीने थांबवावी, अशी मागणी ऑल इंडिया फेयर प्राइस शॉप डिलर्सच्या वतीने करण्यात आली.
नवी दिल्ली येथील रामलिला मैदान ते जंतर-मंतर मैदानापर्यंत भव्य रॅली काढत जेल भरो’ आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी ऑल इंडिया फेयर प्राइस शॉप डिलर्सचे अध्यक्ष पुष्पराज देशमुख, सचिव विश्वंबर बसू, उपाध्यक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी, रमजाल अली अन्सारी, टी. क्रिश्नाप्पा उपस्थित होते. या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी देखील पाठिंबा दर्शविला. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, राजस्थानसह अन्य राज्यातील लाखो रेशनदुकानदार आंदोलनात सहभागी झाले होते. याप्रसंगी केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन स्विकारत पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करून लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन पासवान यांनी दिले. दिवाळीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला.