breaking-newsराष्ट्रिय

नंदादेवी मोहिमेतील सात परदेशी गिर्यारोहकांसह आठ जण बेपत्ता

उत्तराखंडमधील पिठोरगड जिल्ह्य़ात नंदादेवी पूर्व शिखराकडे निघाले असताना आठ गिर्यारोहक बेपत्ता झाले असून त्यात सात परदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यांना शोधून परत आणण्यासाठी मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. या गिर्यारोहकांमध्ये अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यांच्या गिर्यारोहकांचा समावेश असून एक संपर्क अधिकारीही त्यांच्यासमवेत आहे. या चमूचा प्रमुख ब्रिटनचा प्रख्यात गिर्यारोहक मार्टिन मोर्टेन हा आहे.  हे सर्व जण १३ मे रोजी मुनसियारी येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ माउंटेनिरिंग येथून ७४३४ मीटर उंचीच्या नंदादेवी शिखराकडे निघाले होते.

ते २५ मेपासून ते बेपत्ता झाले असून त्या दिवशी ते बेस कॅम्पला परत येणे अपेक्षित होते, असे पिठोरगडचे जिल्हा दंडाधिकारी व्ही. के. जोगदंडे यांनी सांगितले. या शिखराकडे जाण्याचा रस्ता मुनसियारी येथून सुरू होतो. तेथून नंदादेवी पायथ्याकडे जाता येते. त्यासाठी ९० कि.मी. अंतर पायी चालत जावे लागते.

बेपत्ता गिर्यारोहकांना शोधण्यासाठी इंडो तिबेट सीमा पोलिस दलाचे पथक पाठवण्यात आले असून मुनसियारी येथून एक पथकही सकाळी रवाना झाले आहे. त्यात एसडीआरएफ, वैद्यकीय अधिकारी, महसूल पोलिस, स्थानिक लोक यांचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मदतकार्यात अडथळे

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक डेहराडून येथून हेलिकॉप्टरने शनिवारी हवाई पाहणीसाठी निघाले असून प्रतिकूल हवामानाने मोहिमेत अडथळे येत आहेत असे जोगदंडे यांनी सांगितले. हेलिकॉप्टरच्या मदतीने पुन्हा हवाई पाहणीचा प्रयत्न केला जाणार आहे. इंडो तिबेट पोलिस दलाचे पथक नंदादेवी पायथ्यापासून २१ कि.मी. अंतरावर माटरेली येथे पोहोचले आहे. चमोली व रूद्रप्रयाग येथून हेलिकॉप्टर्सच्या फे ऱ्यांची सोय केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button