देशभरात दहा वर्षांत ३८४ वाघांची शिकार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Tiger.jpg)
महाराष्ट्रात अवनी या नरभक्षक वाघिणीला ठार मारल्याचे प्रकरण गाजत असतानाच देशात शिकाऱ्यांनी गेल्या दहा वर्षांत ३८४ वाघांना ठार केल्याचे माहिती अधिकारातील अर्जाला देण्यात आलेल्या उत्तरातून उघड झाले.
याचा दुसरा अर्थ दर महिन्याला तीन वाघांची शिकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. २००८ ते २०१८ दरम्यान एकूण ९६१ जणांना वाघाची शिकार केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाने नोईडा येथील वकील रंजन तोमर यांनी माहिती अधिकारात केलेल्या अर्जावर ही माहिती दिली आहे.
तोमर हे माहिती अधिकार कार्यकर्ते असून त्यांनी गेल्या दहा वर्षांत शिकाऱ्यांनी किती वाघांना ठार मारले व त्यातील किती जणांना शिक्षा झाल्या, असा प्रश्न विचारला होता. विभागाकडे उपलब्ध माहितीनुसार १० वर्षांत ३८४ वाघ मारले गेले असून त्यात ९६१ शिकाऱ्यांना अटक झाली आहे. यात किती जणांना शिक्षा झाल्या याची माहिती नसल्याचे सांगण्यात आले.