दुचाकीस्वार महिलेच्या मृत्यूस कारणीभूत कोण ? पोलिसांचे महापालिकेला पत्र
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/lalita-dhage-accident-abd-death_.jpg)
औरंगाबाद | महाईन्यूज
पथदिव्यांच्या तुटलेल्या केबलमध्ये अडकून जालना रोडवर पडल्याने बसखाली चिरडून ललिता शंकर ढगे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी बसचालकांवर अटकेची कारवाई केल्यानंतर मुकुंदवाडी पोलिसांनी आता तुटलेल्या केबलकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यात आणण्याची तयारी सुरू केली. पोलिसांनी तपासाला वेग देत याविषयी महापालिका आयुक्तांना पत्र पाठविलेले आहे.
मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, जालना रोडवरील रामनगर येथे भीषण अपघातात दुचाकीस्वार महिला पथदिव्याच्या तुटलेल्या केबलमध्ये अडकून पडताच मागून सुसाट आलेल्या बसखाली चिरडून ठार झाली होती. या भीषण दुर्घटनेनंतर त्याच दिवशी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनास्थळावरून बससह पसार झालेला बसचालक भारत वसंतराव निनगुरकरला पोलिसांनी २१ जानेवारी रोजी अटक केली. रस्त्यावर पडलेल्या पथदिव्यांच्या तुटलेल्या के बल वायरमध्ये अडकल्याने दुचाकीसह ललिता पडल्या होत्या. अनेक दिवसांपासून रस्त्यावर तुटलेली केबल वायर लोंबकळत होती. याकडे महापालिकेच्या विद्युत विभाग आणि संबंधित ठेकेदाराने दुर्लक्ष केलेले आहे.