‘दिल्ली-कटरा एक्स्प्रेसमुळे काश्मीरच्या विकासाचा प्रवास सुरू’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/vdh02-2.jpg)
नवी दिल्ली : अनुच्छेद ३७० हा जम्मू व काश्मीरच्या विकासातील अडथळा होता आणि दिल्ली-कटरा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यामुळे या भागाच्या विकासाचा प्रवास सुरू होईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी केले.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह व हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत शहा यांनी गुरुवारी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर या गाडीला हिरवी झेंडी दाखवला.
अनुच्छेद ३७० रद्द करणे आणि दिल्ली-कटरा वंदे भारत एक्स्प्रेसची सुरुवात या दोन गोष्टींमुळे नवा भारत नव्या जम्मू-काश्मीपर्यंत येईल आणि या भागासाठी नवा इतिहास घडवला जाईल, असे मंत्र्यांनी सांगितले.
अनुच्छेद ३७० हा केवळ या देशाच्या ऐक्यातील अडथळा नव्हता, तर काश्मीरच्या विकासातीलही तो सर्वात मोठा अडथळा होता. हा अनुच्छेद हटवण्यात आल्यानंतर या भागातून दहशतवादाचे आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या कल्पनांचे संपूर्ण उच्चाटन करण्यात आम्हाला यश मिळेल, असे देशातच बांधणी झालेल्या दुसऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला रवाना करताना शहा म्हणाले.
येत्या दहा वर्षांमध्ये जम्मू व काश्मीर हा देशाच्या सर्वाधिक विकसित भागांपैकी एक राहील आणि वंदे भारत एक्स्प्रेसच्या सोबतीने विकासाचा प्रवासही सुरू झाला आहे. या गाडीमुळे विकासाला, तसेच धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल असे शहा यांनी सांगितले.
वंदे भारत एक्स्प्रेसमुळे दिल्ली व कटरा यांच्यातील प्रवासाचा वेळ फक्त आठ तासांवर येण्याची शक्यता आहे.