दारुच्या नशेत डॉक्टरची प्रसूती शस्त्रक्रिया, आई आणि बाळाचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/drunk-doctor.jpg)
हॉस्पिटलमध्ये दारुच्या नशेत एका डॉक्टरने गर्भवती महिलेवर प्रसूती शस्त्रक्रिया केल्याची धक्कादायक घटना गुजरातमध्ये समोर आली आहे. राजकोटच्या बोताड येथील सरकारी रुग्णालयात हा प्रकार घडला. प्रसूती शस्त्रक्रियेनंतर २२ वर्षीय महिला आणि तिच्यापोटी जन्मलेल्या मुलीचा काही तासात मृत्यू झाला. आरोपी डॉक्टर परेश लखानीला पोलिसांनी अटक केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
सोनावाला हॉस्पिटलमध्ये हा डॉक्टर आरएमओ विभागाचा प्रमुख आहे. वैद्यकीय दुर्लक्षाचे हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. वैद्यकीय दुर्लक्ष कि, अन्य कुठल्या वैद्यकीय कारणामुळे महिलेचा मृत्यू झाला त्याचा तपास सुरु करण्यात आला आहे. डॉक्टर लखानी (५०) मागच्या १५ वर्षापासून या रुग्णालयात काम करत आहेत.
गाधडा तालुक्यातील आलमपार गावात रहाणाऱ्या कामिनी चाची (२२) या महिलेला सोमवारी संध्याकाळी प्रसूती वेदना सुरु झाल्यानंतर तिला सोनावाला रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टर लखानी यांनी शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे सांगून तात्काळ प्रसूती शस्त्रक्रिया केली. जन्मताच नवजात अर्भकाला मृत घोषित करण्यात आले तर कामिनी यांच्या शरीरातून रक्तस्त्राव सुरु होता. त्यामुळे कुटुंबियांनी कामिनीला बोताड येथील खासगी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला.
रुग्णालयाच्या वाटेवर असताना रात्री ११.३० च्या सुमारास कामिनीचा मृत्यू झाला. कुटुंबिय पुन्हा सोनावाला रुग्णालयात आले तेव्हा डॉक्टर परेश लखानी दारुच्या नशेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. प्राथमिक तपासात पोलिसांनाही डॉक्टर लखानी दारुच्या नशेत आढळले. मृत महिलेच्या कुटुंबियांनी दुर्लक्षामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. भावनगरच्या सर टी हॉस्पिटलच्या समितीला पोलिसांनी मृत्यूचे नेमके कारण शोधण्यास सांगितले आहे. दुर्लक्षामुळे मृत्यू झाला असेल तर आम्ही डॉक्टरविरोधात स्वतंत्र गुन्हा नोंदवू् असे पोलिसांनी सांगितले.