‘दलाल’ ख्रिश्चियन मिशेलला ५ दिवसांची सीबीआय कोठडी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Christian-Michel-1.jpg)
इटलीतील कंपनी ऑगस्टा वेस्टलँडबरोबर व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहारात झालेल्या घोटाळ्यातील दलाल ख्रिश्चियन मिशेलला बुधवारी पटियाला हाऊस न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ५ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. मंगळवारी रात्री मिशेलला दुबईहून भारतात आणले होते. भारतीय तपास यंत्रणांकडून अनेक दिवसांपासून त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले होते.
न्यायालयात सीबीआयकडून विशेष सरकारी वकील डी पी सिंह हे हजर झाले होते. तर आरोपीचे वकील एल्जो जोसेफ यांनी काम पाहिले. सीबीआयने मिशेल यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मिशेल यांच्याकडून अनेक महत्वपूर्ण कागदपत्रांबाबत माहिती घ्यायची आहे, त्यामुळे त्यांची सीबीआय कोठडी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास सुरु असून आम्हाला याप्रकरणी मिशेल यांची कोठडी हवी आहे. कारण दुबईच्या दोन खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित झाले होते.
याप्रकरणी अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. चौकशीत मिशेलकडून अनेक मोठ्या अधिकाऱ्यांची नावे समोर येऊ शकतात. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात मिशेलने भारतीय राजकारणी आणि अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप आहे. १२ हेलिकॉप्टरच्या करार आपल्या बाजूने व्हावा यासाठी केलेल्या व्यवहाराच्या नावावर ही लाच देण्यात आली होती, असे ईडीने म्हटले होते. मिशेलने दुबईतील आपली कंपनी ग्लोबल सर्व्हिसेसच्या माध्यमातून ही रक्कम घेतली होती.