जेट एअरवेजची ‘ती’ ऑफर अफवाच !
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/jet-airways-2.jpg)
नवी दिल्ली : जेट एअरवेजने २५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आपण कोणत्याही विशेष ऑफरची घोषणा केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर जेट एअरवेज २५ वर्ष पूर्ण होत असल्याने प्रत्येक कुटुंबाला दोन विमान तिकीट देत असल्याचा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. याच पार्श्वभुमीवर जेट एअरवेजने आपण अशी कोणतीही ऑफर देत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
ट्विटरच्या माध्यमातून जेट एअरवेजने स्टेटमेंट जारी केले असून, आपल्या वेरिफाइड अकाऊंटवर शेअर होत असलेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा असे आवाहन केले आहे. “#FakeAlert आमच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त फुकटात तिकीट दिलं जात असल्याचा खोटा मेसेज सध्या फिरत आहे. ही कोणतीही अधिकृत स्पर्धा नाहीये, कृपया काळजी घ्या. अधिकृत स्पर्धा फक्त आमच्या वेरिफाइड सोशल मीडिया अकाऊंटवर घेतल्या जातात”, असं ट्विट जेट एअरवेजने केलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये फुकट तिकीट मिळणारा मेसेज व्हॉट्सअॅपवर २० जणांसोबत शेअर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यामध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, जर तुम्ही मेसेज शेअर केला तर पुढील ४८ तासात तुम्हाला ई-मेलवर तिकीट मिळेल. याआधी असाच मेसेज एअर एशिया आणि एमिरेट्सच्या नावे व्हायरल झाला होता.