जर्मनीत ओसामा बिन लादेनच्या जुन्या सहकाऱ्याला अटक
बर्लिन (जर्मनी) – ओसामा बिन लादेनच्या एका जुन्या सहकाऱ्याला आज अटक करण्यात आल्याची माहिती जर्मन अधिकाऱ्यांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या या सहकाऱ्याला त्याच्या मूळ देशात-ट्युनिशियात पाठवण्यात येणार आहे. सामी ए असे ओसामा बिन लादेनच्या सहकाऱ्याचे नाव सांगण्यात आले आहे. मात्र गोपनीयतेच्या कायद्यामुळे त्याचे पूर्ण नाव उघड करण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.
जर्मनीच्या पश्चिम भागातील बोशम या शहरात सामी ए राहत होता. तेथे त्याला दररोज पोलीस स्टेशनला हजेरी द्यावी लागत होती. त्याला ट्युनिशियात पाठवण्यासाठी वैध निर्वासन आदेश जारी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सामी ए हा अल कायदाचा नेता ओसामा बिन लादेन याचा शरीररक्षक होता अशी माहिती मीडियाने दिली आहे.
सामी ए याला ट्युनिशियात पाठवले तर तेथे त्याचा छळ करण्यात येईल अशा शंकेने न्यायालयाल कदाचित त्याच्या निर्वासनाचे आदेश देणार नाही अशी चर्चा या वर्षाच्या सुरुवातीला होत होती.