जय श्रीराम म्हणण्यास नकार दिल्याने मुस्लीम तरुणाला पेटवले?
![The fire started in Mumbai and surrounding cities, with fires raging in three places overnight](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/fire-4_20170914687.jpg)
एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुस्लीम तरुणाला चार जणांच्या टोळक्याने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चौघांनी त्याला जय श्रीराम म्हणण्यास सांगितले होते मात्र, त्याने असं करण्यास नकार दिल्याने त्याला पेटवून दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
पेटवून दिल्याने गंभीररित्या भाजलेल्या पीडित अल्पवयीन तरुणाला काशीच्या कबीर चौरा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तो ६० भाजला असल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे. जय श्रीराम म्हणण्यास या मुलाने नकार दिल्याने त्याला चार जणांच्या टोळक्याने पेटवून दिल्याचा दावा पीडित मुलानेच केला आहे. मात्र, त्याच्या जबाबात विरोधाभास असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
चांदौलीचे पोलीस अधीक्षक संतोषकुमार सिंह यांच्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलाने दोन विविध जबाब दिले आहेत. सुरुवातीला दिलेल्या जबाबात त्याने सांगितले होते की, तो महाराजपूर येथे पहाटे धावण्यासाठी गेले होता. या ठिकाणी त्याला चार जण भेटले त्यानंतर त्यांनी त्याला जवळच्या शेतात ओढत नेले आणि पेटवून दिले. मात्र, पेटवून देण्यापूर्वी या चौघांनी त्याला जबरदस्तीने जय श्रीराम म्हणण्यास सांगितले होते. मात्र, त्याने असे करण्यास नकार दिल्यानंतर या चौघांनी त्याला बेदम मारहाण केली आणि पेटवून दिले.
दरम्यान, पीडित अल्पवयीन मुलाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याने आपला जबाब बदलला आणि त्याने पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले की, चार लोकांनी त्याचे अपहरण करुन बाईकवरुन त्याला हतिजा गावात नेले. मात्र, पोलिसांच्या माहितीनुसार, महाराजपूर आणि हतिजा ही दोन्ही गावे दोन वेगळ्या दिशेला आहेत. पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत, असे यावेळी पोलीस अधीक्षक संतोषकुमार यांनी सांगितले.