breaking-newsराष्ट्रिय

जय शाह यांचेच ‘अच्छे दिन’! भाजपाच्या कार्यकाळात १५०० टक्क्यांनी वाढली संपत्ती

केंद्रिय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे पूत्र आणि अलिकडेच बीसीसीआयच्या सचिवपदी निवड झालेल जय शाह यांच्या कंपनीची कमाई एक हजार ५०० टक्क्यांनी वाढल्याचे वृत्त ‘द कारवान’ या वेबसाईटने दिले आहे. २०१४ मध्ये भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर जय शाह यांच्या कुसुम फिनझर्व्ह एलएलपी (Kusum Finserve LLP) या कंपनीची एकूण कमाई ७९ लाख ६० हजार रुपये इतके होते. मागील पाच वर्षांमध्ये या कंपनीची एकूण कमाई ११९ कोटी ६१ लाख रुपये इतकी झाल्याचे या वृत्तामध्ये म्हटले आहे. कुसुम फिनझर्व्ह एलएलपीनं कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर माहिती दाखल केली होती. कंपनीनं दाखल केलेल्या माहितीच्या आधारे कारवाननं कंपनीच्या व्यवसाय वृद्धीचं वृत्त दिलं आहे. या कंपनीत जय शाह भागीदार असून, कंपनीच्या संचालक पदाच्या समतुल्य पदावर कार्यरत आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर म्हणजेच २०१४ ते २०१९ या आर्थिक वर्षात कुसुम फिनझर्व्ह एलएलपी कंपनीच्या संपत्तीत ११८ कोटी रूपयांहून अधिकची वाढ झाली असल्याचं म्हटलं आहे.

या वृत्तामधील माहितीनुसार २०१७ ते २०१८ दरम्यान जय यांच्या कंपनीला आर्थिक व्यवहाराचे तपशील देण्यास सांगण्यात आले तेव्हा या कंपनीची कमाई भरमसाठ वाढल्याचे पहिल्यांदा लक्षात आले. २०१४ आणि २०१५ मध्ये कंपनीची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसतानाही २०१६ पासून कंपनीला मोठ्या प्रमाणात क्रेडिटवर मोठी रक्कम देण्यात आल्याचे वृत्तामध्ये म्हटले आहे.

कारवानच्या या वृत्ताचा हवाला देत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जय शाह यांच्यावर टीका केली आहे. “द कारवाननं दिलेलं वृत्त आता मारून टाकलं जाईल. कनपट्टी पर गन लगा कर,” असं म्हणत राहुल गांधींनी निशाणा साधला आहे.

३ नोव्हेंबर रोजी काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन जय शाह यांच्या संपत्तीसंदर्भात चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खैरा यांनी जय शाह यांच्या कंपनीने २०१७ ते २०१८ च्या आर्थिक व्यवहारांचा तपशील कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाला दिला नसल्याचा आरोप केला आहे. एखाद्या सामान्य व्यक्तीने आयकर भरला नाही तर तो मोठा गुन्हा समजून त्याला पाच लाखांपर्यंतचा दंड ठोठावला जातो मात्र जय शाह यांच्या प्रकरणात हे असं होताना दिसत नसल्याचे खैरा यांनी म्हटले आहे. “आयकर न भरल्यास होणाऱ्या दंडासंदर्भातील कायदा युवराज जय शाह यांना लागू होतं नाही कारण त्यांच्या कंपनीने २०१७ आणि २०१८ चे विवरण सादर केलेले नाही,” असं टोलाही खैरा यांनी लगावला आहे.

जय शाह यांची कुसुम फिनझर्व्ह एलएलपी ही कंपनी असा कोणता व्यवसाय करते की त्यांना एक हजार ५०० टक्क्यांचा नफा झाला आहे असा सवालही काँग्रेसने उपस्थित केला आहे. शेअर ट्रेडींग, शेती उत्पादने, कन्सल्टन्सी या क्षेत्रात कुसुम फिनझर्व्ह एलएलपी काम करते. हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचेही काँग्रेसने यावेळी स्पष्ट केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button