जम्मू-काश्मीर : राजौरीत पाकिस्तानकडून गोळीबार, एक जवान शहीद, ३ जखमी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Indian-Army-2.jpg)
जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर सोमवारी पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावेळी सुंदरबनी सेक्टरमध्ये सीमेपलिकडून छोट्या शस्त्रांद्वारे गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करण्यात आला. याला आपल्या जवानांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिले.
अखनूरमधील केरी बट्टाल भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असून यामध्ये भारताचा एक जवान शहीद झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. रायफलमन कमरजित सिंग असे या शहीद जवानाचे नाव आहे.
पहाटे साडे पाच वाजता लष्कराचे प्रवक्ते लेफ्ट. कर्नल देवेंदर आनंद यांनी सांगितले की, पाकिस्तानकडून सुरुवातीला नियंत्रण रेषेजवळील सुंदरबनी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावेळी त्यांनी छोट्या शत्रांद्वारे गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. याला भारतीय जवानांनीही सडेतोड उत्तर दिले त्यानंतर सकाळी सव्वासातच्या सुमारास हा गोळीबार थांबला.
दरम्यान, पाकिस्तानी रेंजर्सने नियंत्रण रेषेजवळील ‘चक्कान दा बाग’ येथील क्रॉस पॉईंटजवळ शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. पाकिस्तानी रेंजर्सकडून यापूर्वी गेल्या बुधवारी पुंछ सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.