चीनमध्ये विषाणूचे एका दिवसात ८६ बळी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Corona-Virus.jpg)
चीनमध्ये शुक्रवारी एकाच दिवसात ८६ जण करोना विषाणू संसर्गामुळे मरण पावले असून मृतांची संख्या ७२२ झाली आहे.आतापर्यंत हुबेई प्रांतात जास्त बळी गेलेले आहेत. एकूण निश्चित रुग्णांची संख्या आता ३४,५४६ झाली असल्याचे चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलेले आहे.
एकूण ३१ प्रांतात ३३९९ नवीन रुग्ण सापडले असून ८६ जण मरण पावले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिली आहे. नवीन ८६ मृत्यूंपैकी ८१ हुबेई प्रांतात झाले असून वुहान ही त्या प्रांताची राजधानी आहे. हेलाँगजियांग येथे दोन तर बीजिंग, हेनान व गान्शू येथे प्रत्येकी एक बळी गेला आहे. शुक्रवारी हाँगकाँगमध्ये २६ निश्चित रुग्ण सापडले असून त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. मकाव येथे १० रुग्ण सापडले असून तैवानमध्ये १६ नवीन रुग्ण दिसून आले. हाँगकाँगमध्ये ४२१४ नवीन संशयित रुग्ण असून १२८० जण गंभीर आजारी आहेत. ५१० जणांना उपचारांनंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तेथे एकूण रुग्णांची संख्या ६१०१ झाली असून २७,६५७ जणांना लागण झाली आहे. एकूण २०५० जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. चीनच्या आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार ३.४५ लाख लोक संपर्कात आल्याचे स्पष्ट झाले असून त्यातील २६,७०२ जणांना देखरेखीखाली ठेवले आहे. याआधी १.८९ लाख लोकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले.
वुहानमध्ये अधिकाऱ्यांनी प्रत्येक निश्चित व संशयित रुग्णांवर लक्ष केंद्रित केले असून या विषाणूचा नायनाट करण्याचा चंग बांधला आहे. गुरुवारी असा आदेश देण्यात आला की, १.१० कोटी व त्यावरील लोकसंख्येच्या शहरात संशयित, निश्चित रुग्ण, संपर्कात आलेले लोक, ताप असलेले लोक शोधून काढण्यात यावेत. या लोकांची ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर उपचारांची सोय करण्यात येईल. प्रत्येक अपार्टमेंट व रहिवासी भागात तपासणी नाके सुरू करण्यात आले आहेत. संशय आला तर संबंधित व्यक्तींना घरात किंवा रूग्णालयात राहण्यास भाग पाडले जात आहे. वुहान शहरात ११ हजार डॉक्टर्स पाठवण्यात आले असून सर्वोत्तम आपत्कालीन सेवा देण्यात येत आहे. ११ हजार पैकी तीन हजार डॉक्टर्स हे या रोगाच्या उपचारात निष्णात आहेत.