चिनी आयातीवर 50 अब्ज डॉलर्स करवसुलीचे ट्रम्प यांचे लक्ष्य
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/donaldd-1.jpg)
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी चिनी आयातीवर 50 अब्ज डॉलर्स आयात करवसुलीचे लक्ष्य जाहीर केले आहे. चीनने केलेल्या बौद्धिक मालमत्ता चोरीचा बदला म्हणून त्यांनी ही करवाढ घोषित केली आहे. जर चीननेही जशास तसे या नात्याने अमेरिकन मालावरील आयात करात वाढ केली, तर अमेरिकाही आयात कर आणखी वाढवील अशी ताकिद त्यांनी देऊन ठेवली आहे. शुक्रवारी चिनी मालाच्या आयातीवर 25 टक्के कर जाहीर करून ट्रम्प यांनी चीनने केलेल्या अमेरिकन बौद्धिक संपत्तीच्या चोरी विषयीचे आपले वचन पूर्ण केले आहे.
अनुचित आर्थिक व्यवहाराद्वारे केलेली अमेरिकेच्या तंत्रज्ञानाची आणि बौद्धिक मालमत्तेची चोरी अमेरिका कदापि सहन करणार नाही, असा इशारा देऊन असे प्रकार बंद करण्यासाठीच हे कर आवश्यक असल्याचे आणि यामुळे अमेरिकन अमेरिकन नोकऱ्यांचे संरक्षण होणार असल्याचेही ट्रम्प यांनी एका निवेदनात स्पष्ट केले आहे.
गेले काही महिने वाशिंग्टन आणि बीजिंग यांच्यात चालू असलेल्या शटल कूटनीतीचा परिपाक म्हणून ट्रम्प यांची घोषणा आली आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातील वाढत चाललेला व्यापरी असमतोल दूर करण्यासाठी चीनने केलेले प्रयत्न अशा प्रकारे अपुरे ठरले आहेत.
वाढीव आयात कराचा फटका बसलेला चीन हा एकमेव देश नाही. मागील महिन्यात ट्रम्प यांने स्टील आणि अल्युमिनियमवरील आयात करात मोठी वाढ करून कॅनडा, मेक्सिको आणि युरोपमधील नेत्यांचा रोष ओढवून घेतला आहे. अमेरिकन निर्मात्यांचा अनुचित स्पर्धेपासून बचाव करण्यासाठी त्यांने हे पाऊल उचलले आहे.
शुक्रवारी ट्रम्प व्यवस्थापन करवाढ करण्यात आलेल्या चिनी मालाची यादी प्रसिद्ध करणार आहे.
.