घरबसल्या पासपोर्ट काढण्याचे ऍप सुरू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/passport-6.jpg)
नवी दिल्ली – पासपोर्ट काढणे आता घरबसल्या ऍपच्या माध्यमातून सहज शक्य होणार आहे. सरकारने त्यासाठी एक खास ऍप सुरु केले आहे. या ऍपवर दिलेल्या पत्त्यावरच पोलीस व्हेरिफिकेशन होईल. व्हेरिफिकेशननंतर पासपोर्ट ऍपवर दिलेल्या पत्त्यावर पोहोचवला जाईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली.
पासपोर्ट सेवा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सुषमा स्वराज यांनी ही घोषणा केली. पासपोर्ट सेवा ऍप गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करता येईल. या ऍपच्या माध्यमातून पासपोर्टसंबंधित इतर अनेक कामेही करता येऊ शकतात. पासपोर्टसाठी आता विवाह प्रमाणपत्र आणि घटस्फोटीत महिलांना पतीचे नाव लावण्याची सक्ती नाही, असेही सुषमा स्वराज म्हणाल्या.
नुकताच उत्तर प्रदेशातील हिंदू-मुस्लीम दाम्पत्याला एका अधिकाऱ्याकडून पासपोर्ट नाकारण्यात आला. मुस्लीम धर्मीय पतीला धर्म बदलायला सांगितले गेल्याचंही बोलले जात होते. हे सर्व प्रकरण समोर येताच पासपोर्ट नाकारणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले. तसंच त्या हिंदू-मुस्लीम दाम्पत्याला पासपोर्टही देण्यात आला होता.