गेल्या चार वर्षात 20 हजार भारतीयांनी मागितला अमेरिकेत आश्रय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/india-america-630x420.jpg)
वॉशिंग्टन: गेल्या चार वर्षात म्हणजे सन 2014 पासून सुमारे 20 हजार भारतीय नागरीकांनी अमेरिकेकडे आश्रय मागितला आहे अशी माहिती त्या देशाच्यावतीने देण्यात आली आहे. अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलॅंड सिक्युरिटी विभागातर्फे ही माहिती देण्यात आली आहे. सध्या पंजाबातून अनेक जण बेकायदेशीररित्या अमेरिकेत वास्तव्याला गेले आहेत. त्यांना हुडकून काढण्याचे काम या विभागाने उत्तर अमेरिकन पंजाबी असोशिएशन या संस्थेच्या मदतीने हाती घेतले आहे.
गेल्या दोन वर्षात अमेरिकेत आश्रय मागणाऱ्या भारतीयांची संख्या दुपटीने वाढली आहे. ही आमच्यासाठी चिंतेची बाब आहे असे पंजाबी संघटनेचे कार्यकारी संचालक सतनामसिंग चहल यांनी सांगितले. दरवर्षी हजारो भारतीय नागरीक विदेशात स्थायिक होण्याची संधी घेत आहेत. त्यासाठी ते बेकायदेशी मार्गाचाही अवलंब करीत आहेत. काही ट्रॅव्हल एजंट प्रत्येक व्यक्तीकडून 25 ते 30 लाख रूपये घेऊन त्यांना बोगस कागदपत्रांच्या आधारे अमेरिकेत घुसवण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहितीही त्यांनी दिली. ते म्हणाले की अमेरिकेत विदेशी नागरीकांना आश्रय देण्याचे जे कायदे आहेत त्यात ज्या नागरीकांना त्यांच्या देशात धर्म, जात, सामाजिक बंधने इत्यादी कारणावरून जाच सहन करावा लागत आहे त्यांनाच अमेरिकेत आश्रय देण्याची तरतूद आहे. आपल्या देशातून चोरी फसवणूक किंवा भ्रष्टाचार करून फरारी झालेल्यांना या कायद्याचा वापर करून अमेरिकेत वास्तव्याची अनुमती मिळत नाही ही बाबही संबंधीतांनी ध्यानात घेण्याची गरज आहे असे ते म्हणाले.