गुजरातेत विशेष अधिवेशनाची कॉंग्रेसची मागणी
अहमदाबाद – गुजरात राज्यांतील विविध प्रलंबीत प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षाने केली आहे. विरोधी पक्ष नेते परेश धनानी यांनी या संबंधात मुख्यमंत्री विजय रूपानी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की राज्यातील भाजपने सन 2017 च्या निडणुकीत येथील जनतेला विविध आश्वासने दिली होती त्यातील एकाचीही अजून पुर्तता झाली नसून राज्यातील लोकांच्या समस्यांची तीव्रता वाढल्याने त्या विषयी गांभीर्याने चर्चा करण्यासाठी सरकारने हे विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे.
पटेल आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे पण त्यातील एकही गुन्हा अद्याप मागे घेतलेला नाही असे ते म्हणाले. सन 2015 च्या पटेल आंदोलनाच्यावेळी आंदोलकांवर अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर अजून कारवाई का करण्यात आली नाही असा सवालही त्यांनी केला आहे. तीन वर्षापुर्वी झालेल्या या आंदोलनात किमान बारा जण ठार झाले आहेत. निवडणुकीच्यावेळी पाटीदारांना खूष करण्यासाठी भाजपने त्यांच्यावरील आंदोलनातील खटले मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची सरकारने त्वरीत पुर्तता केली पहिजे अशी मागणीही त्यांनी केली.