केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा रुग्णालयात दाखल
![Amit Shah on a three-day tour of Kashmir from October 23](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/Amit-Shah-1-.jpg)
नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने शहांना सोमवारी रात्री एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ते एम्सचे संचालक आर गुलेरिया यांच्या निगराणीखाली आहेत.
अमित शहा यांनी गेल्याच आठवड्यात कोरोनावर मात केली होती. १४ ऑगस्ट रोजी त्यांनी स्वतः ट्विटरवरून याबाबत माहिती दिली होती. ते म्हणाले होते, ‘आज माझा कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला. मी परमेश्वराचा आभारी आहे. यादरम्यान ज्यांनी माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना केली, मला आणि माझ्या कुटुंबियांना मानसिक पाठबळ दिलं, अशा प्रत्येकाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. मी आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणखी काही दिवस आयसोलेशमध्ये राहीन.’
दरम्यान, २ ऑगस्ट रोजी अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर आता पोस्ट कोव्हिड लक्षणे दिसत असल्याने अमित शाह यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.