काश्मीरात लागोपाठ दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद
घटनेतील कलम 35 एला दिलेल्या आव्हानाचा निषेध
श्रीनगर – जम्मू काश्मीरातील नागरीकांसाठी लागू असलेल्या घटनेतील कलम 35 ए च्या विशेषाधिकाराला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्याच्या निषेधार्थ फुटीरवादी संघटनांनी काश्मीर खोऱ्यात पुकारलेला बंद दुसऱ्या दिवशीही सुरू होता. बंदला मोठा प्रतिसाद मिळाला असून या कडकडीत बंद मुळे तेथील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जॉईन्ट रेझिस्टन्स लीडरशिप या संघटनेने हा बंद पुकारला असून या संघटनेत सय्यद अलि शहा गिलानी, मिरवेझ उमर फारूख, आणि मोहंमद यासीन मलिक या नेत्यांचाही समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार असल्याने हा बंद पाळण्यात आला आहे. या कलम 35 ए अंतर्गत राज्याबाहेरील लोकांना त्या राज्यात मालमत्ता खरेदी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. हे कलम घटनात्मकदृष्ट्या वैध नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
राज्य सरकारने ही सुनावणी स्थगित ठेवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. सध्या आमच्या राज्यात पंचायत राज निवडणुका असल्याने तो पर्यंत या याचिकेवरील सुनावणी स्थगिती करावी अशी मागणी राज्य सरकारने न्यायालयात केली आहे. काल बंदच्या काळात सहा ठिकाणी सुरक्षा दलांवर दगडफेकीच्या घटना घडल्या त्यात सहा जण जखमी झालूे आहेत. दरम्यान नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी या पक्षांनीही बंदला पाठिंबा जाहींर केला आहे. त्यामुळे हा बंद परिणामकारक झाला आहे.