Breaking-newsराष्ट्रिय
काश्मीरमधील ग्रेनेड हल्ल्यांत 8 सुरक्षाजवानांसह 23 जखमी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/grenade-683x.jpg)
श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये आज दहशतवाद्यांनी केलेल्या दोन ग्रेनेड हल्ल्यांत 23 जण जखमी झाले. जखमींमध्ये 8 सुरक्षा जवानांचा आणि 15 नागरिकांचा समावेश आहे. पहिल्या घटनेत दहशतवाद्यांनी शोपियॉंमध्ये सुरक्षा दलांच्या पथकाला लक्ष्य करून ग्रेनेड डागला. त्याचा स्फोट वर्दळीच्या बाजारात घडला. त्यामध्ये 4 पोलीस आणि 12 नागरिक जखमी झाले. दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यात दुसरा ग्रेनेड हल्ला केला. त्यामध्ये सीआरपीएफचे 4 जवान आणि 3 नागरिक जखमी झाले.
दहशतवाद्यांनी मागील आठवडाभरापासून जम्मू-काश्मीरात ग्रेनेड हल्ल्यांचे सत्र आरंभले आहे. प्रामुख्याने सुरक्षा जवान आणि राजकारण्यांना लक्ष्य करून हे हल्ले होत आहेत. त्यामुळे सुरक्षा दलांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.