काश्मीरमधील इंटरनेट बंदीचा उद्योजकांना फटका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/vdh02-3.jpg)
श्रीनगर : काश्मीरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून इंटरनेट सेवा स्थगित असल्याचा मोठा फटका व्यापारासाठी समाज माध्यमांचा वापर करणाऱ्या उद्योजकांच्या नव्या पिढीला बसला आहे.
काश्मीर खोऱ्यातील अनेक तरुण युवक-युवतींनी फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या समाज माध्यमांद्वारे व्यापाराला सुरुवात केली, उपजीविकेसाठी ते इंटरनेटवर अवलंबून आहेत. तथापि, सुरक्षेच्या कारणास्तव ४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आल्याने युवक-युवतींचा व्यापार बंद पडला आहे.
या सेवा स्थगित झाल्याने नव्या पिढीतील उद्योजक बेरोजगार झाले आहेत. श्रीनगरमधील एक रहिवासी ओमायरा या आपला मित्र बिनीश याच्यासह ‘क्राफ्ट वर्ल्ड काश्मीर’ हा ऑनलाइन व्यवसाय करतात, मात्र इंटरनेट सेवा स्थगित झाल्याने व्यवसायात तोटा सहन करावा लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ग्राहकांनी ज्या वस्तूंची मागणी केली त्या तयार आहेत, मात्र नेटवर्क समस्येमुळे त्या ग्राहकापर्यंत पोहोचविल्या जात नसल्याचे त्या म्हणाल्या.