काँग्रेस सत्तेत आल्यास देशभर कृषी कर्जमाफी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/Untitled-14-2.jpg)
राहुल गांधी यांचे आश्वासन; पाटण्यात विरोधकांचे शक्तिप्रदर्शन
केंद्रात सत्तेवर आल्यास देशभर कृषी कर्जमाफी करण्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी केली. केंद्र सरकारची पीक विमा योजना ही शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन मोठय़ा उद्योगपतींच्या खजिन्यात भर टाकणारी आहे, असा आरोप त्यांनी केला. येथील गांधी मैदावरील सभेत राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडत शक्तिप्रदर्शन केले.
अर्थसंकल्पात छोटय़ा शेतकऱ्यांना वर्षांला सहा हजार रुपये देण्याच्या तरतुदीची राहुल यांनी खिल्ली उडवली. केंद्र सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. आम्ही मात्र राजस्थान, मध्य प्रदेश तसेच छत्तीसगडमध्ये सत्तेवर येताच तातडीने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, असे राहुल म्हणाले. बिहारमधील नितीशकुमार यांचे सरकार मोदींप्रमाणे नुसती आश्वासने देत असल्याची टीका राहुल यांनी केली.
राफेल व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप करत ‘चौकीदार चोर है’ या घोषणेचा पुनरुच्चार करत त्यांनी मोदींना लक्ष्य केले. एकेकाळी बिहार हे दर्जेदार शिक्षणाचे केंद्र होते. मात्र, आता ते बेरोजगारीसाठी ओळखले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. सत्तेवर आल्यावर पाटणा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सभेत राजदचे तेजस्वी यादव, लोकतांत्रित जनता दलाचे शरद यादव तसेच काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची भाषणे झाली.
शेतकऱ्यांच्या अनुदानात वाढ शक्य
अर्थसंकल्पात छोटय़ा शेतकऱ्यांना वर्षांला सहा हजार रुपये थेट अनुदान देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. या अनुदान रकमेत वाढ होऊ शकते, असे संकेत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत. राज्यांनी शक्य असेल या रकमेत भर घालावी अशी सूचना जेटली यांनी केली.
‘सहा हजारांचे मोल ‘त्यांना’ कळणार नाही’
दिल्लीतील वातानुकूलित सदनात वावरणाऱ्या श्रीमंतांना एका गरीब शेतकऱ्याच्या लेखी सहा हजार रुपयांचे मोल किती असते, हे कधीच कळणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. या योजनेतील रकमेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळेल, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.