breaking-newsराष्ट्रिय

काँग्रेसच्या पाठिंब्याअभावी कलाम पुन्हा राष्ट्रपती होण्यापासून वंचित

राजमोहन गांधी यांच्या नव्या पुस्तकात दावा

ज्येष्ठ शास्त्रज्ञ ए पी जे अब्दुल कलाम हे २०१२ साली भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या पाठिंब्याने राष्ट्रपतिपदावर पुन्हा निवडून येऊ शकले असते; मात्र काँग्रेस व त्याच्या मित्रपक्षांची अजिबात मदत न मिळाल्याने त्यांनी या शर्यतीतून माघार घेतली, असा दावा एका नव्या पुस्तकात करण्यात आला आहे.

यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणब मुखर्जी यांची प्रतिभा पाटील यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या रूपात देशाचे १३ वे राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली होती.

२००७ साली राष्ट्रपतिपदाची मुदत संपल्यानंतर, कलाम यांचा भारतीय संस्कृतीबद्दलचा उत्साह, काही धार्मिक हिंदू संघटनांच्या नेत्यांची त्यांनी मोकळेपणाने केलेली प्रशंसा आणि देशाच्या संरक्षण क्षेत्रात त्यांनी पूर्वी केलेले काम यांनी त्यांना हिंदू भारताचे चाहते मुस्लीम बनवले, असे इतिहासतज्ज्ञ राजमोहन गांधी यांनी त्यांच्या ‘मॉडर्न साऊथ इंडिया : अ हिस्ट्री फ्रॉम दि सेव्हन्टीन्थ सेंच्युरी टू अवर टाइम्स’ या पुस्तकात म्हटले आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेससह काही राजकीय पक्षांनी अब्दुल कलाम यांचे नाव २०१२ साली राष्ट्रपतिपदासाठी सुचवले; मात्र काँग्रेस व त्याच्या मित्रपक्षांनी ही कल्पना मान्य केली नाही. आपल्या मागे पुरेसे संख्याबळ नसल्याचे लक्षात आल्यावर कलाम यांनी या निवडणुकीसाठी पाऊल पुढे टाकले नाही आणि प्रणब मुखर्जी यांची या पदावर निवड करण्यात आली, असा उल्लेख पुस्तकात करण्यात आला आहे. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी या पदासाठी २००२ साली अब्दुल यांचे नाव सुचवले होते.

सोनियांची इच्छा

२००२ साली भाजप आपला उमेदवार राष्ट्रपती भवनात निवडून पाठवण्याच्या स्थितीत नव्हता. अशा वेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे कलाम यांना पाठिंबा देण्यास उत्सुक होते. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचीही त्यांना पाठिंबा देण्याची इच्छा होती, असे लेखकाने म्हटले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button