कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे धरणे आंदोलन
बंगळूरू : कर्नाटकात बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काँग्रेस आणि जनता दल सेक्यूलरच्या (जेडीएस) नेत्यांकडून विधिमंडळाच्या आवारातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
कर्नाटकात बुधवारी रात्री राज्यपाल वजूभाई वाला यांना अखेर भाजपाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले. याविरोधात काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र, सुप्रीम कोर्टाने शपथविधी सोहळ्याला स्थगिती देण्यास नकार दिला. गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
येडियुरप्पांच्या शपथविधीनंतर काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी विधिमंडळाच्या आवारातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले. काँग्रेस नेते गुलाम नवी आझाद, अशोक गेहलोत, मल्लिकार्जून खरगे आदी नेते या प्रसंगी उपस्थित होते. रिसोर्टवर थांबलेले दोन्ही पक्षांचे आमदारही धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाले.