उद्योगपती कोर्टात १५ मिनिटं उशिरा पोहोचला, न्यायाधीशांनी ४ तास बसवून ठेवलं
![Accused of raping five-year-old Chimurdi hanged; Judgment of Bhokar District Court of Nanded](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/Hammer-1.jpg)
दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने १९९७ च्या उपहार सिनेमा जळीत कांड प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात उशिरा आल्याने बांधकाम क्षेत्रातील उद्योगपती सुशील अन्सल यांना चार तास बसण्याची शिक्षा सुनावली. सुशील हे न्यायालयात १५ मिनिटे उशिराने पोहोचले होते. न्यायालयाने याप्रकरणी आता ३० मार्च रोजी सुनावणीचा आदेश दिला आहे. सुशील यांच्याविरोधात न्यायालयाने सुनावणीस न आल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
२६ मार्च रोजी न्यायाधीश दिपक शेरावत यांनी उपहार सिनेमाचे मालक सुशील आणि त्यांचे भाऊ गोपाळ अन्सल यांच्याविरोधात न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. गोपाळ हे न्यायालयात वेळेवर आले. पण सुशील यांना यायला १५ मिनिटे उशीर झाला. सुशील यांच्या या कृतीमुळे न्यायाधीश नाराज झाले आणि त्यांनी त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यास नकार दिला. तसेच चार तास न्यायालयात बसण्यास सांगितले. तुमच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट असतानाही तुम्ही वेळेवर आला नाहीत, असे न्यायाधीशांनी म्हटले.