breaking-newsआंतरराष्टीय

इम्रान खान यांचा दुटप्पीपणा, टर्कीच्या सीरियावरील बॉम्बफेकीचे पाककडून समर्थन

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा दुटप्पी चेहरा समोर आला आहे. टर्कीने सीरियाच्या उत्तरपूर्व भागात केलेल्या आक्रमक कारवाईचे पाकिस्तानने समर्थन केले आहे. टर्कीला आमचे समर्थन असून आम्ही त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहोत असा संदेश पाकिस्तानने दिला आहे. काश्मीरवरुन भारताविरोधात प्रचार करणाऱ्या इम्रान खान यांनी टर्कीने कुर्द मुस्लिमांवर केलेल्या हल्ल्याचे समर्थन केले आहे. यातून पुन्हा एकदा त्यांचा दुटप्पी चेहरा समोर आला आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशियाचे विभागाचे सहाय्यक सचिव एलिस वेल्स यांनी हाच प्रश्न इम्रान यांना विचारला होता. चीनने लाखो उइगर आणि टर्की भाषिक मुस्लिमांना आपल्या ताब्यात ठेवले आहे. त्याबद्दल इम्रान खान का बोलत नाहीत? असा सवाल त्यांनी विचारला होता. इम्रान खान यांनी टर्कीचे अध्यक्ष रिसेप तय्यिप एर्दोगान यांच्याबरोबर ताज्या घडामोडींबद्दल फोनवरुन चर्चा केली व नेहमीप्रमाणे टर्कीचे समर्थन केले अशी माहिती पाकिस्तान सरकारने शुक्रवारी टि्वट करुन दिली.

अनेक प्रसंगात पाकिस्तानने टर्कीचे समर्थन केले आहे. दहशतवादाबद्दल टर्कीला जी चिंता वाटते त्याच्याशी पाकिस्तान पूर्णपणे सहमत आहे असे इम्रान खान म्हणाले. मागच्या महिन्यात न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्राच्या ७४ व्या महासभेत जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल इम्रान यांनी रिसेप तय्यिप एर्दोगान यांचे आभार मानले होते. टर्कीने सीरियामध्ये केलेल्या कारवाईवर भारताने चिंता व्यक्त केली होती. पाकिस्तानने या उलट भूमिका घेत टर्कीचे समर्थन केले आहे.

पाकिस्तानसाठी टर्की बनवणार युद्धनौका

पाकिस्तान आणि टर्कीमध्ये संरक्षण संबंध विकसित होत आहेत. टर्की पाकिस्तानसाठी युद्धनौकांची बांधणी करणार आहे. जुलै २०१८ मध्ये पाकिस्तानी नौदलाने MILGEM श्रेणीच्या चार युद्धनौका खरेदी करण्यासाठी टर्की बरोबर करार केला. या श्रेणीच्या युद्धनौकांचे वैशिष्टय म्हणजे त्या रडारला सापडत नाहीत असे आनाडोलुने आपल्या वृत्तात म्हटले होते. दोन युद्धनौका टर्कीमध्ये बांधल्या जाणार आहेत तर टेक्नोलॉजी हस्तांतरणातंर्गत दोन युद्धनौकांची बांधणी पाकिस्तानात होणार आहे. MILGEM श्रेणीतील जहाजे ९९ मीटर लांब असून २९ नॉटीकल माइल्स वेग आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button