आसाममध्ये आढळला इसिसचा ध्वज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/isis-1.jpg)
नलबारी –इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) या खतरनाक दहशतवादी संघटनेचा ध्वज आसाममध्ये आढळला. त्या ध्वजावर इसिसमध्ये सामील होण्याचे आवाहन करणारा संदेश लिहीण्यात आला होता. या घडामोडीची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
आसामच्या नलबारी जिल्ह्यात असणाऱ्या एका गावातील शेतात इसिसचा कथित ध्वज बांधण्यात आला होता. स्थानिकांनी गुरूवारी तो ध्वज पाहिल्यावर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तो ध्वज हटवून तपास सुरू केला आहे. इसिसचा ध्वज झाडाला कुणी बांधला याचा कसून शोध घेतला जात आहे. त्या ध्वजावर अरबी भाषेतही काहीतरी लिहिण्यात आल्याचे आढळले. या घटनेच्या एक दिवस आधीच गोवालपारा जिल्ह्यात नदीकाठावरून इसिसचे सहा ध्वज जप्त करण्यात आले. दरम्यान, या दोन घटनांमुळे इसिस आसामसह देशाच्या ईशान्य भागात आपली पाळेमुळे रोवण्याचा प्रयत्न करत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.