आरोग्य हा, सर्व प्रकारचे यश आणि समृद्धीचा पाया आहे- मोदी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/narendra-modi-d.jpg)
- आरोग्य योजनांच्या लाभार्थींशी पंतप्रधानांचा संवाद
नवी दिल्ली – केंद्र सरकारने देशभरात 3600 जनौषधी केंद्रे सुरु केली असून, तेथे 700 पेक्षा जास्त औषधे परवडण्याजोग्या दरात उपलब्ध आहेत. जनौषधी केंद्रांमध्ये उपलब्ध असणाऱ्या औषधांच्या किमती, बाजारात उपलब्ध असणाऱ्या इतर औषधांच्या तुलनेत 50 ते 90 टक्के कमी आहेत. नजिकच्या काळात देशातील जनौषधी केंद्रांची संख्या 5000 पर्यंत वाढवणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. केंद्र सरकारच्या आरोग्य सेवांच्या लाभार्थींशी व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
आजारांमुळे कुटुंबांवर, विशेषत: गरीब आणि मध्यम वर्गातील कुटुंबांवर मोठे आर्थिक ओझे लादले जाते, त्याचबरोबर सामाजिक-आर्थिक क्षेत्रावरही त्याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला परवडण्याजोग्या आरोग्यसेवा मिळतील, याची खातरजमा सरकारने केली पाहिजे. गरीब, निम्न मध्यम वर्ग आणि मध्यम वर्गाला परवडण्याजोग्या दरात औषधे उपलब्ध व्हावी आणि त्यांच्यावरचे आर्थिक ओझे कमी व्हावे, या उद्देशाने प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना सुरु केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
सरकारने गरीब आणि मध्यम वर्गीय रुग्णांच्या सोयीसाठी स्टेंटच्या दरात मोठी घट केली आहे. हृदयासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टेंटची किंमत 2 लाख रुपयांवरुन 29 हजार रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.
गुडघे प्रत्यारोपणासाठी होणारा खर्चही सरकारने 60 ते 70 टक्के कमी केला आहे. या शस्त्रक्रियेसाठी आधी अडीच लाख रुपये खर्च येत असेल. आता मात्र हा खर्च 70 ते 80 हजार रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. देशात दरवर्षी गुडघे प्रत्यारोपणाच्या सुमारे एक ते दीड लाख शस्त्रक्रिया होतात. हे प्रमाण लक्षात घेऊन गुडघे प्रत्यारोपणासाठी होणारा नागरिकांचा 1500 कोटी रुपयांचा खर्च कमी झाला आहे.
प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने देशातील 500 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये सव्वा दोन लाख रुग्णांसाठी 22 लाख पेक्षा जास्त डायलिसिस सत्रे घेतली. मिशन इंद्रधनुषच्या माध्यमातून 528 जिल्ह्यांमधील 3.15 कोटी बालके आणि 80 लाख गर्भवती महिलांचे लसीकरण करण्यात आले. रुग्णांसाठी अधिक खाटा, अधिक रुग्णालये आणि अधिक डॉक्टर उपलब्ध व्हावेत, यासाठी सरकारने 92 वैद्यकीय महाविद्यालये सुरु केली असून, एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमासाठीच्या विद्यार्थी संख्येत 15 हजारांनी वाढ केली आहे.
स्वस्थ देशाच्या उभारणीसाठी नागरिकांनी योगाला जीवनशैलीचा एक भाग म्हणून स्वीकारावे, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी जनतेला केले.
आयुषमान भारत अंतर्गत 10 कोटी कुटुंबांना आरोग्य कवच
आरोग्यसेवा सहज आणि परवडण्याजोग्या दरात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आयुषमान भारत योजनेअंतर्गत 10 कोटी कुटुंबांना 5 लाख रुपयांच्या आरोग्य विम्याचे कवच दिले जाणार आहे. स्वस्थ भारत निर्माण करण्याच्या कामी “स्वच्छ भारत मोहिम’ मध्यवर्ती भूमिका पार पाडत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. स्वच्छ भारत अभियानामुळे देशातील 3.5 लाख गावे उघड्यावरील शौचमुक्त झाली आहेत आणि स्वच्छतेची व्याप्ती 38 टक्के वाढली आहे.