आमच्या पैशावरच चीन उभा राहिला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/trump-1-6-2.jpg)
- अमेरिकचे अध्यक्ष ट्रम्प यांची दर्पोक्ती
वॉशिंग्टन – चीन अमेरिकेकडून दरवर्षी सुमारे पाचशे अब्ज डॉलर्सची कमाई करीत राहिला. वर्षानुवर्ष अमेरिकेकडून मिळालेल्या या पैशाच्या आधारावरच चीन आज उभा राहिला आहे असे प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. त्यांच्यावर आता लगाम घालण्याची वेळ आली असून हे काम पुर्वीच व्हायला हवे होते असे त्यांनी म्हटले आहे.
आमच्या पैशावरच चीन उभा राहिला आहे हे मी नेहमीच सांगत आलो आहे. त्यांनी आपल्याकडून आत्तापर्यंत बरेच काही मिळवले आहे आता आपल्याला जागे व्हावे लागणार आहे असे त्यांनी आज नॅशनल फेडरेशन ऑफ इंडिपेंडेंट बिझीनेसस च्या बैठकीत बोलताना सांगितले.
अमेरिकेबरोबरच्या चीनच्या व्यापारात अमेरिकेच्या बाजूने मोठी तूट आहे. ही तूट आज 376 अब्ज डॉलर्सवर गेली आहे त्यामुळे आता चीनवर मोठे व्यापारी निर्बंध किंवा उपाययोजना अमेरिकेन सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून अमेरिकेने चीनी मालावर पन्नास अब्ज डॉलर्सचे कर लागू केले आहेत. यानंतरही चीनची भूमिका ताठरपणाचीच राहील तर आम्ही आणखी दोनशे अब्ज डॉलर्सचे कर त्यांच्या मालावर लागू करू असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
ट्रम्प यांनी आज या विषयावर बोलताना सांगितले की व्यापाराच्या बाबतीत दोन्ही देशांना समान संधी असायला हवी. अमेरिकेबरोबरच्या व्यापारात चीन एकतर्फी फायदा उठवत राहिला आहे हे आता थांबले पाहिजे असे त्यांनी निक्षुन सांगितले.